The aims of this training program were;
आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात तीन दिवशीय “फार्माकोलॉजी कौशल्य विकास शिबिर” उत्साहात संपन्न
शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालय व इंडिअन फार्माकोलॉजीकल सोसायटी (आय.पी.एस.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसांचे कौशल्य विकास शिबिर नुकतेच संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. ए. बी. चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय विज्ञान संस्था व अनुसंधान संस्थान (आयसर), पुणे येथील, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. निशिकांत सुबेदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा, उपप्राचार्य डॉ. ए. ए. शिरखेडकर, शिबिराचे समन्वयक डॉ. सी. आर. पाटील आदी उपस्थित होते. महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या संशोधन सुविधा अत्याधुनिक असल्याचे डॉ. ए. बी. चौधरी यांनी स्पष्ट केले. फार्माकोलॉजी क्षेत्रातील संशोधन काळाची गरज असून नवीन औषधींच्या विकासासाठी संशोधकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा यांनी प्रास्ताविक केले, डॉ. सी. आर. पाटील यांनी शिबिराची पार्श्वभूमी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. कल्पेश पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सविता पाटील यांनी केले. सदर शिबीर “फार्माकोलॉजी क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन पद्धती” (स्टेप-२) या संकल्पनेवर आयोजित करण्यात आले. तीन दिवशीय कौशल्य शिबीर दिनांक २६ सप्टेंबर ते २८ ऑक्टोबर २०१९ दरम्यान आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात संपन्न झाले. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इत्यादी राज्यातील एकूण १२० संशोधक व विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला. शिबिराच्या प्रथम सत्रात आयसर पुणे येथील डॉ. निशिकांत सुबेदार यांनी मानवी मेंदूची कार्य्रप्रणाली व मेंदूवरील आधारित संशोधन पद्धतींवर प्रकाशझोत टाकला. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे डॉ. अमूल साखरकर यांनी एपिजेनेटीक्स व इम्मुनोहीस्टोकेमिस्ट्री तंत्रज्ञान यावर आधारित प्रात्यक्षिक दाखविले. हैदराबाद येथील जी. पुलारेड्डी महाविद्यालयाचे डॉ. विरेश बंटल यांनी प्राण्यांच्या रक्तवाहिन्यांवर आधारित प्रयोगांचे सादरीकरण केले. अहमदाबाद येथिल एल. एम. शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या डॉ. सुनिता गोस्वामी यांनी पित्तरोगावर आधारित संशोधन पद्धतींचा आढावा घेतला. शिबिराच्या द्वितीय सत्रात ए. डी. इन्स्ट्रुमेन्ट्स, ऑस्ट्रेलिया यांचे तंत्रज्ञ सुमंत भट, वैष्णवी देवी व प्रशांत पवार यांनी प्रयोगशाळेतील उंदरांच्या रक्तदाबाचे व इसीजीचे मापन करून दाखविले. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील फार्माकोलॉजी विभागप्रमुख डॉ. दादासाहेब कोकरे यांनी उंदरांच्या मेंदूतील क्लिष्ट शस्त्रक्रिया आपल्या कौशल्यपूर्ण शैलीने उपस्थितांसमोर दाखविल्या. नाशिक येथील डॉ. संजय कस्तुरे यांनी उंदरांच्या मेंदूचे विषदीकरण करण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवीले. शिबिराच्या अंतिम सत्रात भारती विद्यापीठ पुणे संचालित पूना औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. उर्मिला अस्वार यांनी एलायझा व् वेस्टर्न ब्लॉटिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविले. कर्नाटकातील भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद – राष्ट्रीय पारंपारिक चिकित्सा विज्ञान संस्थान बेळगावचे उपसंचालक व संशोधक डॉ. बनाप्पा उंगर यांनी शिबिराचे आकर्षण असलेल्या “झेब्रा फिश” या संशोधन प्राण्यावर आधारित नाविन्यपूर्ण प्रयोग सादर करून उपस्थितांना शात्रोक्त मार्गदर्शन केले. डॉ. बनाप्पा उंगर यांनी “झेब्रा फिश” संशोधनात्मक प्राण्याच्या अंतर्गत अवयवांच्या अतिसुश्म हालचालींचा वेध घेतला व इसीजीचे मापन यशस्वीपणे करून दाखविले. कार्यक्रमाची सांगता निरोप समारंभाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय सुराणा होते. डॉ. बनाप्पा उंगर यांनी प्रमुख अतिथी व डॉ. उर्मिला अस्वार यांनी विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमात उपस्थिती नोंदविली. शिबिरात सहभागी झालेल्या प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. शिबिरातील सहभागामुळे फार्माकोलॉजी संशोधनातील अत्याधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळाली, संशोधनासाठी प्रोत्साहन व कुशल मार्गदर्शन मिळाले, फार्माकोलॉजी विभागाने भविष्यात अशाच प्रकारच्या शिबिराचे अजोजन करावे अशी प्रतिक्रिया सहभागी झालेल्या संशोधकांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा यांच्या मार्गदर्शनात शिबिराचे समन्वयक व फार्माकोलॉजी विभागप्रमुख डॉ. सी. आर. पाटील, डॉ. सविता पाटील, डॉ. कल्पेश पाटील, डॉ. पंकज जैन, प्रा. मनीष गगराणी, प्रा. उमेश महाजन, प्रा. प्रमोद पाटील, प्रा. उज्वल काटोलकर प्रा. सचिन बोरीकर, प्रा. अलोक सिंग, प्रा. मिलिंद मासुळे, ज्ञानेश्वर पाटील, पंकज चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक ड़ॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा यांनी कौतुक केले.